अंबाजोगाई - सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने २२ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन ते पाच या वेळेत पार पडलेल्या या शिबिरामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. वैद्यनाथ रक्तपेढीच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण २० रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तज्ज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदात्यांची प्राथमिक तपासणी करून सुरक्षित वातावरणात रक्त संकलन करण्यात आले. "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान - एक थेंब रक्ताचा, जीवनदान अनेकांना" हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी शिबिराला मोठा पाठिंबा दिला.

या शिबिरात धिरज राऊत, परमेश्वर धनवडे, सुमित धनवडे, श्रीराम धनवडे, कृष्णा सुरवसे, विनोद महाजन, अमर नाईक, पंकज राऊत, कृष्णा खैरमोडे, अभिजित सुरवसे, सागर पतंगे, ऋषिकेश ढाकणे, अक्षय चोपने, सुमित राऊत, राहुल माळी, प्रवीण चोपणे, किरण कवडे, पवन घोडके आणि वैभव भदाडे यांच्यासह इतर रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे आलेल्या या सर्व रक्तदात्यांचे विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले असून, मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.