अंबाजोगाई: मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अंगात जिद्द बाळगून अनवाणी पायांनी मॅरेथॉन जिंकणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या संघर्षाची दखल घेत आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांचा विशेष गौरव केला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर संकुलात आयोजित 'अमृत दौड' मॅरेथॉनमध्ये रमाबाईंनी कोणत्याही क्रीडा साहित्याविना केवळ मुलींच्या वह्या-पुस्तकांसाठी धावून प्रथम क्रमांक पटकावला होता. या संघर्षमयी मातेच्या संसाराला हातभार लागावा आणि स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आमदार मुंदडा यांनी त्यांना शिलाई मशीन भेट दिली.

मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी पायांची शर्यत

दारिद्र्याशी झुंजणाऱ्या रमाबाई रणवीर यांनी 'अमृत दौड' मॅरेथॉनमध्ये जेव्हा भाग घेतला, तेव्हा त्यांच्याकडे महागडे धावण्याचे शूज किंवा ट्रॅक सूट नव्हते. अंगात केवळ लेकींना शिकवण्याची तीव्र आस होती. गावातील खडतर वाटांवर कष्टाने कणखर झालेल्या पायांच्या जोरावर त्यांनी ही शर्यत जिंकून तीन हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागावा आणि त्यांचे भविष्य कष्टाचे होऊ नये, याच एका भावनेतून त्यांनी ही शर्यत जिंकली होती.

केवळ सत्कार नव्हे, तर कष्टाला बळ

रमाबाईंची ही धडपड समजताच आमदार नमिता मुंदडा यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा साडी-चोळी देऊन सन्मान केला. एका आईच्या संघर्षाला खरी साथ मिळावी म्हणून त्यांनी रमाबाईंना संसाराचा गाडा चालवण्यासाठी शिलाई मशीन दिली, तसेच त्यांच्या दोन्ही मुलींना नवीन कपडे भेट दिले. यासोबतच ज्ञानदीप अकॅडमीमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप करण्यात आले. एका कष्टकरी मातेच्या जिद्दीला मिळालेली ही मायेची साथ समाजातील हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.