अंबाजोगाई: लिनेस क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने आयोजित विविध सामाजिक सेवा प्रकल्पांचे लोकार्पण आणि वार्षिक आढावा बैठकीसाठी प्रांताध्यक्षा लि. कल्पना देशमुख यांनी नुकतीच अंबाजोगाई क्लबला सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यादरम्यान भूतपूर्व प्रांताध्यक्षा लि. सुनंदा गुप्ता आणि प्रांतीय कोषाध्यक्षा लि. शितल अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत लिनेस क्लबच्या अधिकृत बोर्डचे अनावरण करण्यात आले.
दौऱ्याच्या निमित्ताने क्लबतर्फे व्यापक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये 'कर्तव्य' मतिमंद मुलींचे निवासी विद्यालय येथे विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी कपाट भेट देण्यात आले, तर भाविकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध योगेश्वरी मंदिर परिसरात सिमेंटचे बाकडे बसवण्याच्या सेवा प्रकल्पाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. याशिवाय अंबाजोगाई शहरात कार्यरत असलेल्या तीनही जुनिअर क्लबना भेटी देऊन त्यांच्या कार्याची पाहणी करण्यात आली.
साई पॅलेस येथे मुख्य बैठक आणि पदाधिकारी गौरव
क्लबच्या भेटीचा मुख्य कार्यक्रम साई पॅलेस येथे पार पडला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रार्थना, ध्वजवंदन आणि राष्ट्रगीताने सभेची सुरुवात झाली. लिनेस क्लबच्या अध्यक्षा लि. ललिता पुजारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सचिवांनी क्लबच्या वर्षभरातील कामांचा प्रगती अहवाल सादर केला. याप्रसंगी बोलताना प्रांताध्यक्षा लि. कल्पना देशमुख यांनी अंबाजोगाई क्लबच्या कार्याचा गौरव केला. क्लबच्या सक्रिय योगदानामुळे ‘एम एच - ५ हिरकणी’ला अनेक मानाचे पुरस्कार मिळाल्याचे सांगत त्यांनी सर्व सदस्यांचे कौतुक केले. तीन जुनिअर क्लबची यशस्वी स्थापना करणारा अंबाजोगाई क्लब हा पहिला ठरल्याबद्दल कॅबिनेट ऑफिसर लि. प्रभावती तट यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच क्लबच्या अध्यक्षा, सचिव, कोषाध्यक्षा, सर्व कॅबिनेट ऑफिसर्स आणि लि. अंजली चौधरी यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन लि. प्रभावती तट यांनी केले, तर आभार लि. रेवती साखरे यांनी मानले. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा ललिता पुजारी, रेवती साखरे, उषा मोहिते, प्रभावती अवचार (तट), डॉ. सुलभा खेडगीकर, डॉ. नैना शिरसाट, आशा वाघमारे, अयोध्या गाठाळ, अंजली चौधरी, शालिनी भागवत, त्रिवेणी सातपुते, विमल गोरे, भावना झाडे, नंदा साळुंके, पुष्पा बगाडे, सरोज जाजू, सीमा परदेशी, भागीरथी वाडेकर, वर्षा देशमुख, शीला कांबळे, विजया खोगरे आणि आशा कराड या लिनेस भगिनींची उपस्थिती होती. शेवटी ‘वंदे मातरम्’च्या गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!