अंबाजोगाई: दरवर्षी विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि शहरातील पाण्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन अंबाजोगाई नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने यंदा गणेश विसर्जनासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील बोरुळ तलाव, विहिरी आणि बारवांचे पाणी दूषित होऊ नये म्हणून शहरात चार प्रमुख ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणारा विशेष 'फिरता तलाव' ट्रॅक्टर-ट्रॉलीवर सज्ज करण्यात आला आहे. शहरवासीयांनी आपल्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन याच कृत्रिम तलावांमध्ये करावे, असे आवाहन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.


घरापर्यंत पोहोचणार फिरती ट्रॅक्टर-ट्रॉली

ज्या भाविकांना निश्चित केलेल्या विसर्जन स्थळांपर्यंत पोहोचणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विसर्जनाच्या दिवशी प्रभागांमध्ये फिरत्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची सोय करण्यात आली आहे. ट्रॉलीवरच कृत्रिम तलाव उभारण्यात आला असून, ही यंत्रणा थेट गल्लीबोळांमध्ये जाऊन मूर्तींचे संकलन करेल. यामुळे विसर्जन मार्गावरील गर्दी टाळण्यास मदत होईल आणि नागरिकांना घराजवळच भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देणे शक्य होणार आहे.

चार प्रमुख केंद्रांवर स्वयंसेवक सज्ज

गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी चौसाळकर कॉलनीतील श्री गजानन मंदिर परिसर, माळी नगरमधील श्री संत सावता माळी चौक, वंजारी वसतिगृह मैदान आणि मोंढा परिसरातील जुना पेट्रोल पंप या चार ठिकाणी विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी व रोटरी क्लबचे स्वयंसेवक विसर्जनासाठी नागरिकांना सहकार्य करणार आहेत. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने 'पाणी वाचवूया, पर्यावरण जपूया' हा संकल्प करत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, रोटरी क्लबचे अध्यक्ष शकील शेख व सचिव राधेश्याम लोहिया यांनी केले आहे.