बीड (प्रतिनिधी): मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून उद्या, १७ सप्टेंबर रोजी बीड-पुणे (हडपसर) या बहुप्रतिक्षित नवीन रेल्वे सेवेचा ऐतिहासिक शुभारंभ होत आहे. जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी उद्या सकाळी ११:३० वाजता बीड रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे. मागील वर्षी याच दिवशी बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेची सुरुवात झाली होती; आता थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होत आहे.
मान्यवरांची उपस्थिती अन् विकासाला गती
हा भव्य उद्घाटन सोहळा राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. ही रेल्वे सेवा बीड जिल्ह्यासाठी केवळ प्रवासाचे साधन नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची कवाडे खुली करणारी ठरणार आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदारांचा पुण्याकडील प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे. सदर गाडी दररोज रात्री बीड ते हडपसर आणि हडपसर ते बीड अशा दोन्ही बाजूने धावणार असून, तिचे अधिकृत वेळापत्रक उद्याच्या सोहळ्यात जाहीर केले जाईल.
प्रशासनाकडून आभार व्यक्त
हे ऐतिहासिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध घटकांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तसेच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि रेल्वेच्या तांत्रिक विभागातील अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. बीडकरांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याने सर्व नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!