अंबाजोगाई विद्यार्थ्यांनी कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यात मनापासून योगदान देण्याची तळमळ, कष्ट आणि सातत्य असणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आव्हानांना न घाबरता शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या क्षमतेवर निर्णय घ्यावेत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करावी, असे प्रतिपादन अंबाजोगाईचे भूमिपुत्र तथा उत्तराखंडचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) चंद्रशेखर घोडके यांनी केले. येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात आयोजित विशेष विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
माध्यमापेक्षा ज्ञान महत्त्वाचे; न्यूनगंड बाळगू नका
माजी विद्यार्थी असलेल्या घोडके यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. शिक्षण मराठी माध्यमातून घेतले की इंग्रजीतून, यापेक्षा ज्ञान आत्मसात करण्याची जिद्द महत्त्वाची असते, असा सल्ला त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास ठेवावा, मात्र फाजील आत्मविश्वास टाळावा. पुस्तकांसोबतच समाजाकडूनही शिकण्याची वृत्ती ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.
पाण्यासारखा मार्ग शोधा; गुन्हेगारीपासून दूर राहा
ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज अधोरेखित करताना घोडके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पाण्यासारखी लवचिकता आणि ताकद ठेवली पाहिजे; समोर कितीही अडथळे आले तरी मार्ग काढता आला पाहिजे. वेळेचा योग्य वापर करत शालेय वयात गुन्हेगारी प्रवृत्ती आणि चुकीच्या मार्गांपासून पूर्णपणे दूर राहण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते. या वेळी सचिव कमलाकर चौसाळकर, सहसचिव लंकेश वैद्य, सौ. ऋतुजा घोडके, प्रगती घोडके, मुख्याध्यापक ए. आर. पाठक यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृत महाजन यांनी केले, तर उपमुख्याध्यापक व्ही. के. गायकवाड यांनी आभार मानले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!