परळी तालुक्यातील सिरसाळा हद्दीतील कौडगाव फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दिलेल्या जोराच्या धडकेत विकास संतोष भोसले या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या आरोपी चालकाविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी (१० सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. विकास आणि त्याचा मित्र सोनपेठकडून सिरसाळ्याकडे येत असताना कौडगाव फाट्याजवळील देशी दारूच्या दुकानासमोर ही घटना घडली. आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र. डभ २२ / ४२५७) अत्यंत निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून विकासच्या दुचाकीला (क्र. डभ २२ / २१७३) समोरासमोर जोराची धडक दिली. या जीवघेण्या धडकेत विकासचा दुर्दैवी अंत झाला, तर त्याचा मित्र अरुण गायकवाड गंभीर जखमी झाला आहे.

मुलाच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या विकासचे वडील संतोष बाबुराव भोसले (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा सिरसाळा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, ऐन तारुण्यात मुलाचा बळी गेल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.