अंबाजोगाई: केज मतदारसंघाच्या नमिता मुंदडा यांच्याविषयी फेसबुकवर अत्यंत बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी अंबाजोगाई येथील मोहन कुलकर्णी याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​मोहन कुलकर्णी (रा. अंबाजोगाई) याने आपल्या फेसबुक खात्यावरून नमिता मुंदडा यांच्यावर गंभीर आरोप करत बदनामी केली. याप्रकरणी गोकुळ काशीनाथ कदम (रा. कोद्री, अंबाजोगाई), संजय शहाजी गंभीरे (रा. हनुमान नगर, अंबाजोगाई), सतीश विश्वनाथ मुळे (रा. नेकनूर, बीड) आणि भगवान ज्ञानोबा केदार (रा. सांगवी, केज) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

​कुलकर्णी याने नगर परिषद निवडणूक, निधीचा गैरवापर, शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीत नमिता मुंदडा यांचा सहभाग असल्याचे आरोप आपल्या पोस्टमध्ये केले होते. यामुळे मुंदडा आणि कार्यकर्त्यांची जाणीवपूर्वक बदनामी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा बदनामीचा प्रकार असून, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६(३) अंतर्गत सर्वत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​सदर प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण, अंबाजोगाई शहर, नेकनूर आणि केज या चार पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस नाईक सोपणे आणि संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी करीत आहेत.