अंबाजोगाई (प्रतिनिधी) - बिना सहकार, नहीं उद्वार हे ब्रीद घेवून सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार आणि प्रगतीपथावर यशस्वी वाटचाल करणारी, सर्वांना आपली हक्काची अर्थवाहिनी वाटणारी, अंबाजोगाई परिसरातील ग्राहक व सभासदांच्या विश्वास व त्यांच्या पाठबळावरच अल्पावधीतच शहरवासीयांची मिनी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्नी योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्ज घेऊन ते मुदतीत परतफेड करणाऱ्या सभासदांचा उत्कृष्ट ग्राहक म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श्री योगेश्वरी पतसंस्थेने सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून अंबाजोगाईच्या अर्थकारणाला बळकटी दिली असल्याचे चेअरमन माणिक वडवणकर यांनी सांगितले.

येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी तर सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन माणिक वडवणकर यांच्यासह व्यासपीठावर व्हाईस चेअरमन मनोज मोहनलाल लखेरा तसेच संचालक कचरूलाल हिरालाल सारडा, ब्रह्मचारी तुळशीराम इंगळे, सुनील बाबुराव वाघाळकर, रूपेश धोंडीराम चव्हाण, शिरीष किशनराव भावठाणकर, सय्यद अमजद सय्यद मकबुल, सौ.कल्याणी राहुल देशपांडे, सौ.जयश्नी बालासाहेब घाडगे, ऍड.दयानंद अंकुशराव लोंढाळ, जावेद छोटू गवळी आणि व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेची सुरूवात ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचेपूजन व दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. यावेळी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांनी केले. तर ताळेबंद व नफातोटा पत्रकाचे वाचन करून चेअरमन वडवणकर यांनी सांगितले की, श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेवरील ग्राहकांच्या दृढ विश्वासाने ३१ मार्च २०२६ अखेरीस ५५ कोटींच्या ठेवीसह १ कोटी ११ लाख ३१ हजार ६८९ रूपयांचा नफा मिळण्याचे कारण म्हणजे पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि ग्राहक तथा सभासदांचा अतूट विश्वास असून यावरच आज या पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू असल्याची माहिती देवून चेअरमन माणिक वडवणकर यांनी पतसंस्थेची ३१ मार्च २०२६ अखेरची वित्तीय स्थिती सभागृहासमोर ठेवली. त्यानंतर १२ सप्टेंबर २०२६ अखेर पतसंस्थेकडे एकूण २२४९ सभासद असून, पतसंस्थेचे एकूण भाग भांडवल रूपये २ कोटी ६४ लाख, पतसंस्थेचा स्वनिधी हा १० कोटी ९६ लाख, पतसंस्थेकडे सभासदांच्या एकूण ठेवी रूपये ५६ कोटी ७९ लाख, तर सभासद व ग्राहकांना कर्ज वाटप रूपये ५३ कोटी ०५ लाख एवढे केले आहे. पतसंस्थेस ३१ मार्च २०२६ अखेर (आर्थिक वर्ष २०२५-२०२६) रूपये १ कोटी ११ लाख ३१ हजार ६८९ रूपयांचा नफा झाला आहे. श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही साधरणतः ३६ वर्षापूर्वी एका छोट्याशा खोलीत केवळ १० हजार रूपयांच्या गुंतवणुकीवर सुरू करण्यात आली होती. आज सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या अतूट विश्वासाच्या बळावर श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने रूपये दहा हजारावरून आज रूपये ५६ कोटी ७९ लाख रूपये ठेवींचा टप्पा गाठला आहे. पतसंस्थेने सातत्याने हजारो छोटे, मोठे व्यावसायिक, हातगाडी, फेरीवाले, भाजीपाला व फळविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मागणीनुसार वेळोवेळी मदत करून त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी भक्कम पाठबळ दिले आहे. तसेच वेळोवेळी सभासदांच्या मुला-मुलींचे शिक्षण, विवाह, घर बांधकाम तसेच नवीन जागा खरेदी करण्यासाठी देखील पतसंस्थेकडून वेळोवेळी आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही वेळोवेळी अर्थार्जनासोबतच अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असते. पतसंस्थेच्या वतीने प्रतिवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वाटप, रूग्णांना फळ वाटप करण्यात येत आहे. अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक म.अंबाजोगाई ही बँक या पतसंस्थेची मातृबँक म्हणून कार्यरत आहे. योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही आजच्या घडीला केवळ पतसंस्था राहिली नसून ती एक मिनी बँक म्हणूनच ओळखल्या जाऊ लागली आहे. श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था नांवारूपाला आणण्यासाठी पतसंस्थेचे सर्व ग्राहक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार, जामीनदार आणि हितचिंतक यांच्यासह संस्थापक मार्गदर्शक राजकिशोर मोदी, पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ, व्यवस्थापक यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे वडवणकर यांनी सांगितले. यावेळी शासकीय आयटीआय, परळी वैजनाथ येथील सेवानिवृत्त प्राचार्य महादेव पुजारी यांचा पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी, चेअरमन माणिक वडवणकर आणि व्हाईस चेअरमन मनोज मोहनलाल लखेरा यांनी सेवागौरव केला. तर पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक मंडळाकडून ज्या सभासदांनी पतसंस्थेचे कर्ज घेऊन त्या कर्जाची मुदतीत परतफेड केल्याबद्दल सभासद कर्जदार युसूफ इमाम गवळी, दिपक ज्ञानोबा कांबळे, किशन निवृत्ती नरूटे, शाहेदाबी रफिक तांबोळी, पंडित रामराव आरसुळ, मंगल संगमेश्वर स्वामी, ज्ञानोबा लक्ष्मण वाघमोडे यांचा पतसंस्थेचे उत्कृष्ट ग्राहक म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे सभासद आनंद टाकळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार पतसंस्थेचे संचालक सुनिल वाघाळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पतसंस्थेचे कर्मचारी रोहित वाघमारे, सिमा मुळे, नारायण हाके, अनिकेत पाणकोळी, रविंद्र लंगे, विनोद कांबळे, तसेच पतसंस्थेचे पिग्मी प्रतिनिधी राम भस्मे, विजयकुमार गजरे, प्रकाश कदम, सतिश मठपती, विशाल देशमुख आणि सलिम मामू यांनी पुढाकार घेतला. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.