अंबाजोगाई - मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आणि लोककला संवर्धन उपक्रमांतर्गत योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग व योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुसरी पोवाडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत एकूण सहा शाळांच्या संघांनी डफावर थाप मारत दर्जेदार सादरीकरण केले. घंटा वाजवून स्पर्धेचे उद्घाटन डॉ. शुभदा लोहिया यांच्या हस्ते झाले. पोवाड्यातून मिळणारी ऊर्जा बालशाहीरांनी समाजकार्यासाठी वापरावी, असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.

शाहीर आणि विचारवंतांची उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते. तसेच व्यासपीठावर योगेश्वरी क्रीडा प्रबोधिनीचे रमण सोनवळकर, माणिकराव लोमटे, एन. के. गोळेगावकर, प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख, उपप्राचार्य प्रा. डॉ. रमेश सोनटक्के, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संपदा कुलकर्णी आणि डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आगामी द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर, स्पर्धेच्या प्रारंभीच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केलेल्या प्रथमेश उपाडे व योगेश्वरी खाडे या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांना अभिवादन म्हणून गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नमन सादर केले. स्पर्धेचे परीक्षण रत्नदीप शिघे आणि प्रफुल्ल दहिवाळ यांनी केले.

पारितोषिक वितरण आणि विजेते

योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भीमाशंकर शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाचवी ते सातवीच्या प्राथमिक गटात योगेश्वरी नूतन मुलांचे मंदिर विभागाने प्रथम, सरस्वती पब्लिक स्कूलने द्वितीय तर खोलेश्वर विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. आठवी ते दहावीच्या माध्यमिक गटात गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालय प्रथम, खोलेश्वर माध्यमिक विद्यालय द्वितीय आणि योगेश्वरी नूतन विद्यालय माध्यमिक विभागाने तृतीय क्रमांक पटकावला.

प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी प्रथम आलेल्या संघास वैयक्तिक १०००१ रुपयांचे पारितोषिक जाहीर केले असून या विजेत्या संघाचे सादरीकरण १७ सप्टेंबर २०२६ रोजी मुक्ती संग्राम दिनी होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संपदा कुलकर्णी यांनी केले, तर आभार डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले. अविष्कार जंगले व श्वेता जाधव यांनी स्पर्धेचे आणि प्रा. रमेश सोनवळकर यांनी पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी प्रकाश म्हेत्रे, धनराज कासारे आणि आकाश पवार यांनी संयोजन परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी बालशाहीरांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.