बीड: जिल्ह्यातील नेकनूर येथे एका धक्कादायक घटनेत, अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा बनाव रचणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांचा खरा चेहरा समोर आला आहे. पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्याच मुलीचा बालविवाह लावून, ठरलेले पैसे न मिळाल्याने त्यांनी अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली होती. बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) या प्रकरणाचा छडा लावत कोल्हापूर येथून पीडित मुलीची सुटका केली असून, मुलीच्या जबाबावरून आता फिर्यादी आई-वडीलच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत.

पैशांसाठी रचला अपहरणाचा बनाव

नेकनूर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर (गुन्हा रजिस्टर नंबर ५४/२०२६) या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. तपासादरम्यान एक भयंकर सत्य उघडकीस आले. आई-वडिलांनीच मुलीचा बालविवाह लावून दिला होता आणि या बदल्यात आरोपीकडे तब्बल २ लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी १० हजार रुपये ऑनलाईन आणि १० हजार रुपये रोख स्वरूपात त्यांनी स्वीकारले होते. मात्र, उर्वरित पैसे देण्यास नकार दिल्याने, आई-वडिलांनी सूडबुद्धीने अपहरणाची खोटी तक्रार दाखल केली. यामुळे घाबरलेले आरोपी आणि पीडित मुलगी घरातून पसार झाले होते.

AHTU ची कोल्हापूरमध्ये धडक कारवाई

सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मूळ फाईलचे बारकाईने अवलोकन केले. फिर्यादी आणि साक्षीदारांकडे कसून चौकशी केल्यानंतर आणि तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर, पीडित मुलगी आणि आरोपी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे १२ सप्टेंबर २०२६ रोजी AHTU च्या पथकाने कोल्हापूर गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांनाही ताब्यात घेतले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी तपास

बीडमध्ये आणल्यानंतर नेकनूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला. तिच्या जबाबावरूनच पैशांचा हव्यास असलेल्या जन्मदात्यांचा खरा डाव उघडकीस आला. ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, उपनिरीक्षक उषा चौरे, हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे आणि शिपाई भाऊसाहेब कारले या पथकाने ही केस यशस्वीपणे हाताळली.