बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात एका ३५ वर्षीय तरुणाचे अज्ञात कारणावरून अपहरण झाल्याची धक्कादायक आणि चिंताजनक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास नागझरी परिसरातील राहत्या घरातून अज्ञाताने या तरुणाला फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल गोविंद वाकडे (वय ३५, मूळ रा. बर्दापूर, सध्या रा. नागझरी परिसर, अंबाजोगाई) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. घरातून अचानक पती बेपत्ता झाल्याने त्यांच्या पत्नी अश्विनी अतुल वाकडे (वय २६) यांनी शोधाशोध केली. मात्र, काहीही थांगपत्ता न लागल्याने त्यांनी शुक्रवारी दुपारी पोलिसांत धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली. या अनपेक्षित घटनेमुळे कुटुंबाला मोठा भावनिक धक्का बसला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १४०(३), १४२ आणि १३८ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल गाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपहरणकर्त्याचा आणि बेपत्ता अतुलचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून वेगाने तपास चक्रे फिरवली जात आहेत.











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!