बीड: ​मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता बीड रेल्वे स्टेशनवर बहुप्रतिक्षित बीड-पुणे (हडपसर) या नवीन रेल्वे सेवेचा ऐतिहासिक शुभारंभ होणार आहे. बीड जिल्ह्याला थेट पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या या रेल्वेमुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार असून, या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

विकासाची नवी दारे खुली

मागील वर्षी याच दिवशी बीड-नगर रेल्वे मार्ग सुरू झाला होता. आता बीड-पुणे ही नवी रेल्वे सुरू होत असल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अतिशय सुखकर होणार आहे. ही रेल्वे दररोज रात्री बीड ते हडपसर आणि हडपसर ते बीड अशी धावणार आहे. तिचे सविस्तर वेळापत्रक उद्घाटन सोहळ्यात अधिकृतपणे जाहीर केले जाणार आहे. ही रेल्वे सेवा बीड जिल्ह्यासाठी केवळ एक मार्ग नसून विकासाची नवी दारे खुली करणारी मोठी संधी मानली जात आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि कृतज्ञता

हा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या रेल्वे मार्गाचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक वर्षांपासून विविध घटकांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासनातील महसूल, भूमी अभिलेख तसेच रेल्वेच्या तांत्रिक विभागाचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी विशेष आभार मानले आहेत. या विकासपर्वाचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.