अंबाजोगाई (प्रतिनिधी): मराठी विज्ञान परिषद मुंबई, बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्र आणि मराठी विज्ञान परिषद शाखा अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विज्ञान वारी’ युवा विज्ञान प्रसारक प्रशिक्षण शिबिराचा नुकताच उत्साहात समारोप झाला. या शिबिराच्या समारोप सत्रास शिक्षण संस्थेचे सहसचिव भीमाशंकर शेटे, संचालक अंगद कऱ्हाड, अभिजीत जोंधळे, तसेच विज्ञान परिषदेचे अधिकारी प्रकाश मोडक, अभय यावलकर, सुचिता भिडे, अनघा वक्ते आणि केतन शेलार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगांवर भर
समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रकाश मोडक म्हणाले की, या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांनी जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यामुळे हे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आगामी काळात समाजात विज्ञानाचा प्रभावी प्रसार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रयोगांतून शिकून विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करावा, या हेतूने हे शिबिर उपयुक्त ठरल्याचे केतन शेलार यांनी नमूद केले. या वेळी अभिजित जोंधळे, अनघा वक्ते आणि सुचेता भिडे यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.
परिश्रमातून शिबिर यशस्वी
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी हेमंत धानोरकर, आदित्य कदम, दत्ता बन्सोडे, उमराव शेप, तुषार करपुडे, अनिकेत कऱ्हाड, वृंदा कुलकर्णी आणि सारिका संगेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!