बीड: बीड आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित पुणे-बीड एक्सप्रेसला (गाडी क्र.११४३३/११४३४) अखेर रेल्वे बोर्डाकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून, यामुळे बीडकरांचा पुणे प्रवास अधिक सुखकर व वेगवान होणार आहे.

नवीन रेल्वेसेवा दररोज धावणार असून, दोन्ही बाजूंनी वेळापत्रक अतिशय सोयीचे ठेवण्यात आले आहे. गाडी क्र.११४३४ (बीड ते पुणे): बीडवरून रात्री ९.३० वाजता सुटून ही गाडी अंमळनेर, न्यू आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाईन आणि उरुळी मार्गे सकाळी ५.२० वाजता पुणे येथे पोहोचेल. गाडी क्र.११४३३ (पुणे ते बीड): पुण्यावरून रात्री १०.४५ वाजता प्रस्थान करून ही गाडी सर्व प्रमुख स्थानकांवर थांबत सकाळी ६ वाजता बीड येथे दाखल होईल. बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर आल्यानंतर या भागातील नागरिकांना शैक्षणिक, व्यावसायिक व वैद्यकीय कारणांसाठी पुण्याला जाणे अत्यंत सुलभ झाले होते. मात्र, नियमित आणि थेट गाडीची तीव्र आवश्यकता होती. या नवीन एक्सप्रेसमुळे बीड आणि पुण्यातील दळणवळण अधिक दृढ होईल. एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यासाठी खा.बजरंग सोनवणे हे प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार असल्याने बीडकरांत आनंदाचे वातावरण आहे. रेल्वे बोर्डाच्या या अधिकृत मंजुरीमुळे बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, सर्वसामान्य प्रवासी, व्यापारी आणि चाकरमान्यांकडून खा.बजरंग सोनवणे यांचे विशेष आभार मानले जात आहेत.

ही रेल्वेसेवा बीड जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याशी जोडणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच बीडकरांच्या विविध प्रश्नांसाठी आणि रेल्वे सुविधा विस्तारासाठी आमचा पाठपुरावा भविष्यातही असाच सातत्याने सुरूच राहील.
-खा.बजरंग सोनवणे, बीड.