अंबाजोगाई (प्रतिनिधी)-- गणेशोत्सव म्हटला की मोठा आवाज, पीओपीच्या मुर्ती आणि प्लास्टिकची सजावट हे चित्र सर्वत्र दिसते. पण याला छेद देत अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनने यंदा पर्यावरणपुरक गणेश मंडळाची स्थापना करून सर्वांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे.
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या आवारातच या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारात निर्माण करण्यात आलेल्या सुसज्ज सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. या सभागृहातच गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.
सदरील गणेशाची मुर्ती शाडू मातीपासून व पर्यावरणवादी साहित्यातून तयार करण्यात आली आहे. मुर्ती समोर सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर टाळून नैसर्गिक फुले, पाने आणि इतर पर्यावरण वादी साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
शहर पोलीस स्टेशन आवारात पर्यावरणवादी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली असून याची माहिती समाज व सोशल माध्यमाना व्हावी म्हणून आज शहरातील मान्यवर पत्रकारांचे हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार-लेखक सुदर्शन रापतवार, वार्ता समुहाचे सम्पादक परमेश्वर गित्ते, झुंजार न्यूज चेनलचे सम्पादक दत्तात्रय अम्बेकर, लोकनामा न्यूज चेनल चे सम्पादक सन्जय जोगदंड, व्यन्कटेश जोशी, सय्यद नईम, प्रशांत लाटकर हे उपस्थित होते.
गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर पारंपारिक वाद्यांच्या गजरात बैलगाडीतून बाप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिली.
या संपूर्ण उपक्रमात सर्व पोलीस उपनिरीक्षक, सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून स्वतः उपस्थित राहून हा उत्सव साजरा करत आहेत.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिल्याने नागरिकांमधून कौतुक होत असून, इतर सार्वजनिक मंडळांनीही याचा आदर्श घ्यावा, अशी चर्चा शहरात सुरू आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!