अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथे सार्वजनिक बोरवर पाणी भरण्याच्या कारणावरून एका पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या राड्यात कर्मचाऱ्याच्या तोंडावर दगड मारून दात पाडण्यात आला असून, त्यांच्या पत्नीलाही अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नागनाथ ज्ञानोबा केंद्रे (वय ३७) हे पाणीपुरवठ्याचे सरकारी कामकाज करत होते. याचवेळी बोरवर पाणी भरण्यावरून धम्मानंद अच्युत तरकसे याने तिथे वाद उकरून काढला. या वादानंतर धम्मानंदने नागनाथ यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी आणि चापटांनी मारहाण करत मुका मार दिला. नागनाथ यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्यांना शिवीगाळ केली. रागाच्या भरात त्याने नागनाथ यांच्या तोंडावर थेट दगड मारून त्यांचा एक दात पाडला व गंभीर जखमी केले. तसेच जाताना जिवे मारण्याची धमकी दिली.

या भयानक प्रकारानंतर जखमी नागनाथ केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात आरोपी धम्मानंद तरकसे याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडे हे करत आहेत. गावात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.