अंबाजोगाई: ‘आई राजा उदो उदो... योगेश्वरी देवीचा उदो उदो’ या जयघोषाने महाराष्ट्राचे कुलदैवत आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेले योगेश्वरी देवीचे मंदिर दुमदुमून गेले आहे. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिरात घटस्थापना झाल्यापासून देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक रात्रंदिवस गर्दी करत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक व रंगीबेरंगी विद्युत रोषणाई भाविकांचे डोळे दिपवून टाकत आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला ऐतिहासिक परंपरा असून, देवल कमिटीचे संचालक, मानकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत घटस्थापना करण्यात आली. तेव्हापासून मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दररोज सकाळी महाभिषेक आणि नित्योपचार पूजेनंतर भाविकांसाठी दर्शन खुले केले जाते. भजन, कीर्तन, प्रवचन आणि विशेष पूजेच्या आयोजनाने वातावरण भक्तिमय झाले असून, नवस फेडण्यासाठी व श्रीफळ बांधण्यासाठी तरुणांसह हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने रांगा लावत आहेत.
सुरक्षेचा चोख बंदोबस्त; मात्र अतिक्रमणामुळे भाविकांना त्रास
उत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठिकठिकाणी नाकेबंदी व गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, दर्शनासाठी येणाऱ्या महिला, वृद्ध आणि इतर भाविकांना मंदिर परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणाचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पायी चालणे आणि वाहनांची ये-जा करणे जिकिरीचे ठरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येकडे नगरपालिका व संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी भाविकांमधून व्यक्त होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!