अंबाजोगाई (प्रतिनिधी) - अंबाजोगाईसह पंचक्रोशीतील महिलांचा आर्थिक स्तर उंचाविण्याच्या विधायक उद्देशाने केवळ महिलांनी महिलांसाठी साधारणता १० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च २०२६ अखेर रूपये ३ लक्ष १२ हजार एवढा नफा झाल्याची माहिती पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ.सुनीता राजकिशोर मोदी यांनी ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ.सुनीता राजकिशोर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार भवन, प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सुरूवातीला दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमापूजनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी १) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, २) दिनांक ३१.०३.२०२६ अखेर अहवाल, तेरीजपत्रक, नफा तोटा व ताळेबंद पत्रकास मान्यता देणे, ३) दिनांक ३१.०३.२०२६ अखेरच्या नफा विभागणीस मंजुरी देणे, ४) आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व दोष दुरूस्तीस मान्यता देणे, ५) सन २०२६-२७ वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे, ६) लेखापरीक्षकांच्या नियुक्तीस मान्यता देणे, ७) मा.अध्यक्ष यांच्या अनुमतीने ऐनवेळी येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा करणे हे विषय सभेपुढे होते. अहवाल वर्षांत पतसंस्थेच्या एकूण १६ सभा झाल्या. त्या सर्व सभांमध्ये सभासदांचे हित लक्षात घेऊन व कामकाज करून निर्णय घेण्यात आले. पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ.सुनीता मोदी यांनी ताळेबंद, नफातोटा, हिशोब पत्रक, अंदाजपत्रक व नफा विभागणी सभेसमोर ठेवताना सांगितले की, महिलांना काही प्रमाणात आर्थिक स्वायत्तता मिळवून देण्यासाठी व समाजातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्याचा फायदा कुटुंबाला व्हावा याच सकारात्मक हेतूने केवळ महिला भगिनींसाठी मागील अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ.सुनीता राजकिशोर मोदी यांनी दिली. या पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहार व विकासाच्या दृष्टीने पर्यायाने अंबाजोगाई शहरातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेच्या सचिव शोभा बाबू खडकभावी, तसेच संचालिका डॉ.रूपाली सुधीर धर्मपात्रे, संगीता विष्णू सरवदे, उषा गणेश मसने, अंजली विष्णुपंत मस्के, सविता विजय रापतवार, सुरेखा बाबुराव खंडाळे, परवीन नुजहत फारोखी, जमुना जयप्रकाश चोकडा, सायली सुहास मोहिते आणि भागधारक, सभासद, ठेवीदार, खातेदार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. ३१ मार्च २०२६ अखेर पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ही २३४१ एवढी आहे. तर भागभांडवल हे रूपये २६ लाख ४० हजार, एकूण ठेवी रूपये ०५ कोटी ५१ लाख २६ हजार एवढ्या आहेत. तर मार्च २०२६ अखेर पतसंस्थेने समाजातील उद्योजक महिलांना रूपये ०४ कोटी ०८ लाख ३८ हजार एवढे अर्थसहाय्य (कर्जवाटप) करून त्यांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न केला आहे. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पतसंस्थेने अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेत ०२ कोटी ७४ लाख ४० हजार ६९५ रूपयांची गुंतवणूक देखील केली आहे. पतसंस्थेचा स्वनिधी हा रूपये ४३ लाख एवढा जमा असल्याची माहिती अध्यक्ष सौ.सुनीता मोदी म्हणाल्या. ३१ मार्च २०२६ अखेर पतसंस्थेस रूपये ०३ लाख १२ हजार एवढा नफा झाल्याचे सौ.सुनीता मोदी यांनी सांगत या यशाचे सर्वस्वी श्रेय हे पतसंस्थेचे मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांच्यासह पतसंस्थेच्या भागधारक, सभासद, ठेवीदार, खातेदार, जामीनदार आणि महिलांनी घेतलेल्या कर्जाचा वेळेवर केलेला परतावा यालाच द्यावे लागेल असेही सौ.सुनीता मोदी म्हणाल्या. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला पतसंस्था महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून त्यांनी आजमितीला संस्थेत एकूण ०३ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये शाखा व्यवस्थापक सागर संतोष कंगळे यांच्या समवेत लिपिक सचिन बालासाहेब काशीद, रोखपाल अनिल लिंबाजी काळे व शिपाई अंकुश माने हे कर्मचारी आहेत. तसेच ०१ नित्य निधी ठेव प्रतिनिधी सौ.सुषमा गोविंद खरटमोल यांचा देखील संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा असल्याचे पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ.सुनीता राजकिशोर मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी पतसंस्थेच्या भागधारक, सभासद महिला भगिनी उपस्थित होत्या.