जुन्या व्यवहाराच्या वादातून एका तरुणाच्या पाठीत लोखंडी गज आणि डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील भावठाणा येथे घडली आहे. हा जीवघेणा हल्ला ४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

अनंत बाबुराव कापसे (वय ३६) हे त्यांच्या गावात असताना दिनेश मारुती वाघमारे आणि मारोती दत्तू वाघमारे यांनी जुन्या व्यवहाराची कुरापत काढून वाद सुरू केला. यावेळी दिनेश याने अनंत यांच्या पाठीत लोखंडी गज मारला, तर मारोतीने त्यांच्या डोक्यावर आणि डोळ्याखाली दगडाने जोरात वार केले. आरोपींनी त्यांना बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. अनंत कापसे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.