अंबाजोगाई: जमिनीच्या व्यवहारातील उर्वरित पैशांच्या वादातून सख्या भावाने शेतात रचून ठेवलेल्या ५० क्विंटल सोयाबीनच्या ढिगाऱ्यांवर पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना बर्दापूर शिवारात घडली आहे. यात शेतकऱ्याचे तब्बल सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेख गणी शेख जाफर (वय ५७, रा. शिवाजी चौक, बर्दापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचा सख्खा भाऊ शेख कलीम शेख जाफर (रा. बर्दापूर) याने आपली जमीन शेख गणी यांना विकली होती. या खरेदीखताचे उर्वरित सत्तर हजार रुपये न दिल्यास शेतातील सोयाबीन पेटवून देण्याची धमकी आरोपीने दिली होती. गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आरोपी शेख कलीम याने शेतात जाऊन वडिलांना कोणता ढीग कोणाचा आहे, याची विचारणा केली. वडील बाजूला जाताच त्याने ढिगाऱ्यांवर पेट्रोल टाकून आग लावली.
कुटुंबीयांनी शेतात धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ५० क्विंटल सोयाबीन आणि जुने सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले होते. यामध्ये सुमारे तीन लाख पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर शेख गणी यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात आरोपी शेख कलीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीराम दिलीप चिवळे हे करीत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!