घाटनांदूर - घाटनांदूर रेल्वे स्टेशन परिसरात वाहनाला साईड देण्यावरून झालेल्या वादातून एका ऑटो रिक्षाचालकासह त्याला वाचवण्यासाठी आलेल्या महिला नातेवाइकांना चौघांनी लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी अर्टिका कार चालकासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉर्न वाजवण्यावरून वाद अन् प्राणघातक हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेंडवाडी (ता. परळी, जि. बीड) येथील रहिवासी श्रावण बापूराव चव्हाण (वय २३) हे आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षाने (क्रमांक MH 22 U 2078) घाटनांदूर येथे सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या मजुरांना सोडून परत येत होते. घाटनांदूर रेल्वे स्टेशनसमोर पाठीमागून आलेल्या अर्टिका कारच्या (क्रमांक MH 24 AW 6265) चालकाने हॉर्न वाजवल्याने श्रावण यांनी रिक्षा रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र, रस्त्यावर पडलेल्या दगडांमुळे साईड देण्यास झालेला विलंब कारचालकाच्या पचनी पडला नाही. कारमधून उतरलेल्या व्यक्तीने शिवीगाळ करत हुज्जत घातली आणि काही वेळातच इतर तीन साथीदारांना बोलावून आणले. यानंतर चौघांनी मिळून रिक्षाचालक श्रावण यांना लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण सुरू केली.

सोडवण्यासाठी आलेल्या महिलांनाही मारहाण; जीवे मारण्याची धमकी

मारहाणीचा आवाज ऐकून तक्रारदाराची बहीण रेणुका दिलीप जाधव व सासू कविता भुजंग जाधव या भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास धावून आल्या. मात्र, आरोपींनी संतापाच्या भरात या दोघींनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खाली पाडले. या झटापटीत रेणुका यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून पडली. आरोपींनी सर्वांना जीवे मारण्याची उघड धमकी देत परिसरात दहशत माजवली.

कारचालकासह चौघांवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर जखमी श्रावण चव्हाण यांनी तातडीने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या तक्रारीवरून अर्टिका कारचा चालक अनिल लिंबाजी बडे (रा. चोपनवाडी, ता. अंबाजोगाई) व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब मुरलीधर डोंगरे करत आहेत.