अंबाजोगाई, प्रतिनिधी : जिल्हा परिषद विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या महाश्रमदान अभियानाला अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत गावातील चौक, शाळा व मंदिर परिसराची स्वच्छता केली.

या महाश्रमदानात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, बचत गटातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेतून ग्रामस्थांनी स्वच्छतेचा संदेश दिला.

यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडीचे वाटप करण्यात आले. तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध झालेल्या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा सरपंच सौ. महादेवी बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास उपसरपंच बालाजी देशमुख, ग्रामपंचायत सदस्य कुलदीप देशमुख, आकाश वाघमारे, उत्तरेश्वर देशमुख, प्रीतम वाघमारे, आशाताई शिवनंदा वाघमारे, अंगणवाडी कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका प्रत्येकीचमे मॅडम, सीआरपी तसेच ज्येष्ठ नागरिक हरिश्चंद्र वाघमारे, प्रकाश वाघमारे, दगडू साहेब देशमुख, किसन गवळी प्रीती किचमे सहशिक्षिका आदी उपस्थित होते.

वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी महाश्रमदानात सहभागी होत ग्रामस्थांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. आगामी काळात नांदडी गावासाठी एक हजार वृक्षांची रोपे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सातत्याने सहभागी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी सुनील शिवाजीराव मामाडगे व गटनेते आबासाहेब देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागामुळे नांदडी येथे स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला