​दिवाळीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून ही बळीराजाची क्रूर चेष्टा आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या मदतीची घोषणा केली होती. ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारे एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी या तुटपुंज्या मदतीला मान्यताच कशी दिली, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

​सध्या राज्यात सोयाबीन काढणी आणि कापूस वेचणी सुरू असताना मजुरांचे पैसे द्यायलाही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत बँकांनी आडकाठी आणली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचना असूनही सिबिल आणि बेबाकी प्रमाणपत्राच्या नावाखाली शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज नाकारले जात आहे. मागील दोन महिन्यांपासून शेतकरी बँकांच्या चकरा मारून हतबल झाले आहेत.

​एकीकडे हातात पीक नाही, जनावरांना चारा नाही आणि रब्बीची पेरणी कशी करायची हा मोठा प्रश्न समोर आहे. अशा गंभीर परिस्थितीत राज्य सरकार एखादी पतपेढी चालवल्यासारखा कारभार करत असून, सरकारची संवेदनशीलता संपली आहे का, असा सवाल आपेट यांनी केला. शेतकऱ्यांच्या या क्रूर चेष्टेबद्दल महाराष्ट्र सरकारला कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.