अंबाजोगाई - तालुक्यातील राडी येथील एका वृद्ध शेतकऱ्याने सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळून राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. अंकुश रंगनाथ गंगणे (वय ६४, रा. राडी, ता. अंबाजोगाई) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही हृदयद्रावक घटना गुरुवारी (१५ ऑक्टोबर) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गातील तीव्र हतबलता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
माळरानावरील पिके करपल्याने आर्थिक संकट
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश गंगणे यांच्या नावावर अवघी एक हेक्टर जमीन असून ती माळरानावर आहे. चालू हंगामात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके पूर्ण जळून खाक झाली. आधीच कर्जाचा बोजा आणि त्यात यंदाही उत्पादन शून्य झाल्यामुळे त्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून पडले होते. हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड विवंचनेमध्ये वावरत होते. अखेर याच नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी गळफास लावून टोकाचे पाऊल उचलले.
संसार उघड्यावर; पोलिसांत नोंद
गंगणे यांच्या निधनामुळे त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलांचा आधार हिरावला असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने पोलीस पाटील तसेच तलाठी यांना पाचारण केले. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!