अंबाजोगाई (प्रतिनिधी): आरोग्यसेवेसोबतच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत सुविधा पुरवण्याच्या सामाजिक बांधिलकीतून ग्लोबल विकास ट्रस्टने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात शुद्ध फिल्टर पाण्याच्या मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच औपचारिक उद्घाटन पार पडले असून, यामुळे रुग्णालयात येणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रुग्ण व नातेवाईकांसाठी दिलासादायक पाऊल

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी परिसरातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक दाखल होतात. उपचाराच्या धावपळीत व आर्थिक विवंचनेत असताना अनेकदा त्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठीही अडचणींना सामोरे जावे लागत होते. हीच गरज लक्षात घेऊन ग्लोबल विकास ट्रस्टने पुढाकार घेत आधुनिक फिल्टर मशीन कार्यान्वित केली. या उपक्रमामुळे रुग्णांच्या आरोग्याचे रक्षण होण्यास मदत होणार असून स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा जलनायक मयंक गांधी, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर धपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्व जपत रुग्णांच्या सेवेसाठी पुढे आलेल्या ग्लोबल विकास ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.