बीड: बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत, कुत्रा अंगावर आल्याने घाबरून पळालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा चुलीवरील गरम दूध अंगावर पडून मृत्यू झाला आहे. दुर्गा असे या मृत चिमुकलीचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुर्गा घरासमोर खेळत असताना अचानक एक कुत्रा भुंकत तिच्या दिशेने आला. कुत्र्याला घाबरून दुर्गाने जीव वाचवण्यासाठी थेट घरात धाव घेतली. मात्र, अंगणात चुलीवर तापवण्यासाठी ठेवलेल्या गरम दुधाच्या पातेल्याला तिचा धक्का लागला आणि ते उकळते दूध तिच्या अंगावर सांडले. यात ती गंभीररीत्या भाजली गेली.
घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने खाजगी रुग्णालयात आणि प्रकृती खालावल्याने नंतर बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. नुकताच दसऱ्याच्या दिवशी कुटुंबाने तिचा वाढदिवस अत्यंत आनंदात साजरा केला होता. 'मला मोठी झाल्यावर डॉक्टर व्हायचंय' असे सांगणाऱ्या दुर्गाचा असा वेदनादायी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!