बीड : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून, बीड ग्रामीण पोलिसांनी बहिरवाडी शिवारात धडक कारवाई करत २५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विनापरवाना वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्या गस्तीदरम्यान कारवाई
दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत नियमित गस्तीवर होते. बहिरवाडी शिवार परिसरात संशयास्पदरीत्या जाणारा भारत बेंझ कंपनीचा हायवा ट्रक पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी संशयावरून वाहनाचा पाठलाग करून ते थांबवले असता, त्यात विनापरवाना वाळू भरलेली आढळली. चालकाकडे रॉयल्टी पावती किंवा वाहतुकीचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याने महसूल बुडवून ही वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या कारवाईत पोलिसांनी २५ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि ३६ हजार रुपये किमतीची ६ ब्रास वाळू असा एकूण २५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस अंमलदार कापसे, अभिमान जायभाय आणि होमगार्ड पवार यांच्या पथकाने केली.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!