अंबाजोगाई: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. अश्विन प्रतिपदेला रविवारी सकाळी १० वाजता योगेश्वरी मंदिरात तहसीलदार तथा देवल समितीचे अध्यक्ष विलास तरंगे यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात येईल. या नऊ दिवसांच्या उत्सवात भाविकांना धार्मिक अनुष्ठानांसोबतच कीर्तन, भजन, प्रवचन आणि सुगम व शास्त्रीय संगीताची पर्वणी अनुभवता येणार असल्याची माहिती देवल समितीचे सचिव गिरधारीलाल भराडिया यांनी दिली. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शन रांग, वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
नामवंत गायकांची संगीत सेवा
महोत्सवादरम्यान दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक भजनी मंडळांची भजने सादर होतील. दररोज सायंकाळी राज्यातील नामांकित गायकांच्या संगीत मैफिली रंगणार आहेत. यात ओंकार प्रभूघाटे, असावरी देगलुरकर, भाग्यश्री देशपांडे, ज्ञानेश्वरी गाडगे, श्रुती बोरगावकर आणि दीपिका भिडे यांच्या गायनाचा समावेश आहे. विशेष म्हणजे बुधवारी सायंकाळी प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांचे सुश्राव्य 'गीत रामायण' तसेच मधुवंती बोरगावकर यांचे गायन होणार आहे. पुढील दिवसांत अर्चना कान्हेरे, जयंत केजकर, कृष्णा बोंगाणे, रेवा नातू, भाग्यश्री टिकले, पंडित श्रीपाद लिंबेकर आणि मुग्धा गावकर यांच्यासह स्थानिक कलावंतांचे गायन व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
होमहवन आणि पालखी सोहळा
अश्विन शुद्ध नवमीला सोमवारी सकाळी ८ वाजता वेदमंत्रांच्या घोषात होमहवनास प्रारंभ होईल आणि सकाळी सव्वा अकरा वाजता पूर्णाहुती दिली जाईल. त्यानंतर मंगळवारी विजयादशमीनिमित्त दुपारी १ वाजता योगेश्वरी देवीची पारंपरिक पालखी मिरवणूक सीमोल्लंघनासाठी नियोजित मार्गाने निघेल. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन देवल समितीच्या विश्वस्तांनी केले आहे.











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!