अंबाजोगाई: महाविद्यालयातील ओळखीचा गैरफायदा घेत एका २० वर्षीय विवाहित तरुणीचा सतत पाठलाग करून तिला प्रेमासाठी धमकावणाऱ्या आणि मानसिक त्रास देणाऱ्या तरुणाला अंबाजोगाई शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कृष्णा मारुती केंद्रे याच्याविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे.
पीडित तरुणीने ६ ऑक्टोबर रोजी पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, ती अंबाजोगाई येथे नर्सिंगचे शिक्षण घेत असताना तिची कृष्णा केंद्रे याच्याशी ओळख झाली होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत कृष्णाने सार्वजनिक ठिकाणी तिला गाठून प्रेमाची मागणी घातली. तरुणीने स्पष्ट नकार दिल्यानंतरही या तरुणाने तिचा सतत पाठलाग सुरूच ठेवला. तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून तिला सतत मानसिक त्रासात ठेवले, ज्यामुळे व्यथित होऊन तरुणीने तिचे शिक्षणही अर्धवट सोडले होते.
वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने हिंमत दाखवत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी कृष्णा केंद्रे याला तात्काळ बेड्या ठोकल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.











प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!