अंबाजोगाई : येथील रोशन कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने केलेल्या भीषण हल्ल्यात फरहान कुरेशी या अवघ्या सहा वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, निष्पाप मुलाच्या जाण्याने कुरेशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुटुंबीयांचे सांत्वन आणि नागरिकांची उपस्थिती

या भीषण घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी तातडीने फरहानच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी नगरसेवक संजय गंभीरे, किरण भालेकर, सामाजिक कार्यकर्ते शोहेब कुरेशी, नूर पटेल यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतप्त नागरिकांनी शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली.

सुरक्षिततेसाठी पालिका कटिबद्ध

फरहानच्या मृत्यूनंतर अंबाजोगाई शहरातील मोकाट कुत्र्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा भयानक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पालिका प्रशासन ठोस पावले उचलेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला. नागरिकांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता असून, कोणत्याही निष्पाप निष्पाप जिवाचा असा अंत होऊ नये म्हणून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत तत्काळ आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही मुंदडा यांनी यावेळी दिली.