अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील सदर बाजार नाका परिसरात कत्तलीसाठी एका पिकअप वाहनातून अवैधरित्या गोवंश घेऊन जाणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन गाई आणि एका वाहनासह एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अमोल जालिंदर गायकवाड (वय ४२, रा. अंबाजोगाई) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून फैजल कुरेशी (रा. धारूर, जि. बीड) याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक आणि महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ही कारवाई करण्यात आली. पिकअप (MH43AD7752) थांबवताच चालक गर्दीचा फायदा घेत पळून गेला. वाहनाची तपासणी केली असता त्यात ४० हजार व ३० हजार रुपये किमतीच्या दोन गाई चारापाण्याविना निर्दयीपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

ही कारवाई पोलीस हवालदार गित्ते आणि चालक चाटे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याची नोंद अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार दत्ता चंद्रकांत गित्ते करत आहेत.