अंबाजोगाई: अंबाजोगाई ते तळेगाव या मार्गावर धावणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस आज अंबाजोगाई-जवळगाव रस्त्यावर खड्ड्यांमुळे अनियंत्रित होऊन रस्त्याखाली उतरली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस उलटली नाही आणि मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह अनेक प्रवासी प्रवास करत होते. एकाच आठवड्यात बस रस्त्याखाली उतरण्याची ही दुसरी घटना असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अरुंद रस्ता आणि पाईपलाईनच्या कामामुळे धोका
हा रस्ता आधीच अत्यंत अरुंद असून त्यावर पडलेले मोठे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यातच जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध आणि कडेला खोदण्यात आलेले खड्डे व्यवस्थित बुजवण्यात आलेले नाहीत. रस्त्याला साईडपट्टी शिल्लक नसल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना चालकांचा ताबा सुटतो. या गंभीर त्रुटींमुळे आजची बस थेट रस्त्याच्या खाली उतरली. बस पलटी होण्याच्या बेतात असतानाच थांबल्याने आत बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचले, मात्र त्यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रवाशांचा संताप
एकाच आठवड्यात दोन वेळा एकाच मार्गावर एसटी रस्त्याखाली जाण्याची घटना घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रशासन कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून साईडपट्ट्या व्यवस्थित कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थ आणि प्रवाशांनी दिला आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!