अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने वृद्धेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलबाई सुदामराव पवार (वय ६५, राहणार डोंगर पिंपळा, तालुका अंबाजोगाई) या अंबाजोगाईत आपल्या मुलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. नऊ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्या गावी परतण्यासाठी बसस्थानकावर आल्या. अंबाजोगाई ते सोनवळा या बसमध्ये चढत असताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात महिलेने त्यांना धक्का दिला. याच वेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्या महिलेने कमलबाई यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पळवले. चोरीला गेलेल्या या दागिन्यात ८० मणी आणि श्रीदेवी जोड असून त्याची अंदाजे किंमत ४० हजार रुपये आहे.
दागिना चोरीला गेल्याचे लक्षात येताच कमलबाई पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून १३ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भागवत नागरगोजे हे करीत आहेत.










प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!