अंबाजोगाई: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलिसांनी सराईत दारूमाफिया किशोर बाबराव जाधव (वय ३९, रा. चनई, ता. अंबाजोगाई) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

किशोर जाधव याच्यावर हातभट्टीची दारू तयार करणे, जवळ बाळगणे, वाहतूक आणि विक्री करणे यांसारखे महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमांतर्गत सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, मात्र तो या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली. भविष्यातही अवैध वाळू वाहतूक, गुटखा विक्री, जुगार, हातभट्टी चालवणारे आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिले आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, उपनिरीक्षक आनंद शिंदे, रमेश घुले, पोलीस हवालदार श्रीकृष्ण वडकर, मंगेश भोले, अनिल डोंगरे, संतोष गाडे, हनुमंत चादर, भागवत नागरगोजे, महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा बीडचे सहायक उपनिरीक्षक अभिमन्यू औताडे, सचिन सानप, सचिन आंधळे, रामचंद्र केकाण, गोविंद भताने, बबन सलगर आणि बिबीषण चव्हाण यांनी ही कारवाई पार पाडली. गुन्ह्याची नोंद आणि पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.