केज: गतवर्षीची थकीत ऊसबिले तात्काळ द्यावीत, चालू हंगामाचा ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत आणि दुष्काळी स्थितीमुळे शासनाने प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, या मागण्यांसाठी मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंबाजोगाई-कळंब महामार्गावरील धनेगाव फाटा येथे मंगळवारी २५ गावांतील शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन करत महामार्ग रोखून धरला. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कारखानदारांच्या मग्रुरीविरोधात संतप्त शेतकरी एकवटले
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे आणि शेतकरी नेते जगदीश फरताडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. चालू हंगामासाठी प्रतिटन ४,२५० रुपये पहिली उचल आणि ५,००० रुपये अंतिम दर जाहीर करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत थकीत बिले दिली जात नाहीत, तोपर्यंत संबंधित कारखान्यांना ऊस दिला जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या घेऊन कारखाने बंद पाडू, असा निर्वाणीचा इशारा नेत्यांनी दिला.
दुष्काळ आणि वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकरी अडचणीत
पावसाच्या दीर्घ खंडामुळे उसाची वाढ खुंटली असून मांजरा धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच खते, औषधे आणि मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अंबासाखर, नॅचरल शुगर, येडेश्वरी आणि गंगामाऊली कारखान्यांनी तात्काळ दर जाहीर करून लेखी आश्वासन द्यावे; अन्यथा संपूर्ण ऊस वाहतूक आणि कोयता बंद आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा देण्यात आला.
प्रशासनाकडून निवेदन स्वीकार; चोख पोलीस बंदोबस्त
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन गंगामाऊली शुगर व येडेश्वरी कारखान्याचे शेतकी अधिकारी, मंडळाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी दाखल होऊन निवेदन स्वीकारले. यावेळी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात मुन्ना गोंडे, सतीश शिंदे, केशव ढगे, अरविंद मोरे, दिलीप लोंढे, अण्णा गायकवाड, विश्वास शिनगारे, डॉ. उत्तम खोडसे, शाहू ठोंबरे, बाळासाहेब गुजर, बाळासाहेब मोरे, उमेश गायकवाड यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!