बीड: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल २३ मोबाईल फोन शोधून काढले आहेत.

जिल्हाभरात हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची दक्षतापूर्वक काळजी घ्यावी, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू घेऊन जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि अशोक राडकर यांच्या पथकाने हरवलेल्या मोबाईलचा तांत्रिक तपास करून हे मोबाईल हस्तगत केले व पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.