अंबाजोगाई - श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संकेत मोदी मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत विविध धार्मिक ठिकाणी प्रार्थना करण्यात आली. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर ओढवलेले दुष्काळाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे आणि बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, या उद्देशाने गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) शहरात महाआरती, दर्ग्यात चादर अर्पण आणि बुद्धवंदनेचा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

सर्वधर्म समभावातून बळीराजाच्या समृद्धीसाठी साकडे

कार्यक्रमाची सुरुवात अंबानगरीचे ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या महाआरतीने झाली. यानंतर चनई येथील हजरत किरमानी बाबा यांच्या दर्ग्यावर श्रद्धेने चादर चढवण्यात आली. तसेच संघर्षभूमी येथे बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. पावसाअभावी शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून, सर्वसामान्य जनतेलाही या झळा सोसाव्या लागत आहेत; त्यामुळे हे दुष्काळी सावट टळावे यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली.

युवा नेतृत्वाचा शैक्षणिक व सामाजिक गौरव

परदेशातून उच्चशिक्षण पूर्ण करून आलेल्या संकेत मोदी यांनी अल्पवधीतच शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. मोदी लर्निंग सेंटरच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूलसह जोधाप्रसादजी महाविद्यालय, संगणक महाविद्यालय, डी. फार्मसी, बी. फार्मसी, स्वच्छता निरीक्षक, डी.एड. व बी.एड. महाविद्यालयांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची कवाडे खुली केली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब, ढोल-ताशा स्पर्धांचे आयोजन आणि 'लढा मुक्तीसंग्रामाचा' या महानाट्यासारख्या उपक्रमांतून त्यांनी शहराच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा दिली आहे.

मान्यवरांची उपस्थिती व शुभेच्छांचा वर्षाव

या उपक्रमास उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया, नगरसेवक तथा गटनेते सय्यद ताहेर, मुन्ना पठाण, दत्ता सरवदे, महेश कदम, भिमसेन लोमटे, अकबर पठाण, आकाश कराड, जावेद गवळी, खलील जाफरी, सचिन जाधव, अश्विन सावंत, संतोष चिमणे, शुभम लखेरा, अक्षय लखेरा, सनी लखेरा, रोहन कुरे, शरद काळे, दत्ता थाटकर, अस्लम, शोएब चाऊस, शैलेश गोस्वामी, प्रमोद कोंबडे, ज्योतीराम कुरणे, विशाल पोटभरे, विशाल जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून संकेत मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.