बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सोनी सावरगाव येथे एका वयोवृद्ध शेतकरी दांपत्याला बेदम मारहाण करत अज्ञातांनी ४ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, पाटोदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७५ वर्षीय शेतकरी अशोक भगवान जोशी आणि त्यांची पत्नी त्यांच्या शेतातील 'श्रम-साफल्य' या घरात झोपले होते. त्यावेळी अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या मागील भिंतीवरून उडी मारून उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला. या गुन्हेगारांनी कोणतीही दया न दाखवता वयोवृद्ध दांपत्याला लाकडी काठी आणि लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी घरातून सोन्याचे लॉकेट, अंगठ्या, कानातील फुले, गळ्यातील पोत आणि ५५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या भयंकर घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून, वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाटोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भावड या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.