पाटोदा: पाटोदा बसस्थानक परिसरात एका महिलेच्या बॅगेतून झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी चुंबळी फाटा येथे सापळा रचून एका ४५ वर्षीय महिला आरोपीला अटक केली असून, तिच्याकडून आठ तोळे सोने आणि रोख रकमेसह तब्बल १३ लाख ९७ हजार १६० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पाटोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना, गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. या गुन्ह्यातील संशयित आरोपी सोजर सुरेश भोसले (वय ४५, रा. पारनेर, ता. पाटोदा) ही चोरीचे सोने विकण्याच्या उद्देशाने चुंबळी फाटा येथे थांबली असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष तातडीने कारवाई करत या महिलेला ताब्यात घेतले.

या महिला आरोपीकडे कसून चौकशी केली असता, तिच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेले ८ तोळे ४ ग्रॅम सोने आणि १० हजार रुपये रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शेखर औटे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला.