धारूर: शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून सख्ख्या भावाने भावाला बेदम मारहाण करत त्याचा दात पाडल्याची धक्कादायक घटना धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापुराव मुकुंदराव तिडके (वय ७०, रा. भोगलवाडी, ता. धारूर) असे या घटनेतील फिर्यादीचे नाव आहे. तर रामप्रभू मुकुंदराव तिडके (रा. भोगलवाडी, ता. धारूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
बापुराव तिडके हे १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्या शेतातील गोठ्यावर जनावरांचे दूध काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा भाऊ रामप्रभू तिथे आला व त्याने बापुराव यांच्या ज्वारी पेरलेल्या शेतातून ट्रॅक्टर घातला. यावर बापुराव यांनी पिकातून ट्रॅक्टर का घालत आहेस, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने रामप्रभू याने बापुराव यांच्या तोंडावर बुक्की मारून त्यांचा समोरचा दात पाडला. तसेच उजव्या हाताच्या दंडावर दगडाने मारून दुखापत केली. तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर बापुराव तिडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रामप्रभू तिडके याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय बन्सी मुंडे हे करत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!