माजलगाव: माजलगाव तालुक्यातील मनुर वसाहत येथे भाचीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाला तलवारीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आसाराम श्रावण ढगे (वय ४१, रा. मनुर वसाहत, ता. माजलगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांची १७ वर्षीय भाची गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी करण बाळु ढगे याने तिचा हात धरून छेड काढली आणि पळवून नेण्याची धमकी दिली. आसाराम ढगे हे नातेवाईकांसह या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जाणार होते. तेवढ्यात करण बाळु ढगे, बाळु मुरलीधर ढगे, काळु मुरलीधर ढगे, अर्जुन बाळु ढगे, युवराज तात्याराव ढगे, अमोल मुरलीधर ढगे, एक धोत्रे नावाचा इसम आणि इतर तीन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. मनुर वसाहत) हे हातात तलवारी आणि लाठ्याकाठ्या घेऊन आसाराम यांच्या घराजवळ आले. बाळु ढगे आणि काळु ढगे यांनी आसाराम यांच्या डोक्यावर तलवारीने सपासप वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आसाराम ढगे यांच्या तक्रारीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील सर्व आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन वसंत ओगले हे करीत आहेत.