बीड: महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नव्या यादीत जिल्ह्यातील ४ हजार ७९१ शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाचा समावेश असून, यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या ३ हजार १४५ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ६४६ शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत मोठा दिलासा मिळाला आहे. या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायती, सेवा सहकारी संस्था आणि बँक शाखांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

चौथ्या यादीत संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ

नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेली ही चौथी यादी संपूर्ण कर्जमुक्तीची असून, यामध्ये एकापेक्षा जास्त बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकी ग्राह्य धरण्यात आली असून, १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात आले आहेत. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांशी संबंधित दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची खाती शासनाच्या 'हेअर कट' धोरणानुसार निरंक केली जाणार आहेत. याशिवाय, वयस्कर, बोटांचे ठसे न उमटणारे किंवा मयत शेतकऱ्यांसाठी १९ ऑगस्ट २०२६ च्या विशेष कार्यप्रणालीनुसार (SOP) लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

प्रशासनाचे ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४ हजार ६१ पात्र शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली असून, त्यापैकी १ लाख ५८ हजार ५९८ शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. पहिल्या दोन याद्यांनुसार शासनाने जिल्ह्यासाठी ९१८ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले आहेत. अद्याप ४५ हजार ४६३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे. ही यादी अंतिम नसून पुढील याद्याही प्रसिद्ध होणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन मोफत ई-केवायसी पूर्ण करावी, तसेच रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी त्वरित नवीन पीक कर्ज वाटप करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी केले आहे.