पाटोदा: तालुक्यातील नाळवंडी येथे एका आठ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने केलेल्या अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद असून, या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवावा, असे कडक निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिले आहेत.

पोलिस अधीक्षकांना तातडीचे निर्देश
नाळवंडी गावात घडलेल्या या अमानुष घटनेची माहिती मिळताच मंत्री पंकजा मुंडे यांनी त्वरित बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. एका ६५ वर्षांच्या वृद्धाने अवघ्या आठ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या भयंकर प्रसंगामुळे पीडित मुलीचे कुटुंब अत्यंत दहशतीखाली आणि मानसिक धक्क्यात आहे. या कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून देणे आणि त्यांना आधार देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असली पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.

कठोर शिक्षेची मागणी
या संतापजनक घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, केवळ अटक करून न थांबता, या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करावेत आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, जेणेकरून नराधमाला कायद्याचा धाक बसेल आणि त्याला लवकरात लवकर कठोरात कठोर शासन होईल, अशी ठाम भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे.