केज (प्रतिनिधी) - मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून केज तालुक्यातील नांदूरघाट येथे एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला चौघांनी बेल्ट, लाकडी काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'यापुढे स्टेटस ठेवल्यास तुला व तुझ्या कुटुंबाला कापून टाकू', अशी उघड धमकी देत आरोपींनी दहशत माजवली. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कॉलेजसमोर आणि भररस्त्यात दुहेरी मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाव्होली (ता. केज) येथील रहिवासी असलेला चैतन्य प्रशांत देशमुख (वय १७) हा नांदूरघाट येथील जीवन प्रगती महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिकत आहे. बुधवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास चैतन्य कॉलेजसमोरील एका दुकानावर पाणी पिण्यासाठी गेला असता प्रताप मोराळे, ऋतुराज ढाकणे, प्रकाश तांदळे आणि दिग्विजय मोराळे हे चौघे तिथे आले. त्यांनी थेट "तू जरांगे पाटलांचे स्टेटस का ठेवतोस?" असा जाब विचारला. त्यावर "मला आवडते म्हणून मी स्टेटस ठेवतो" असे उत्तर देताच आरोपींनी संतापून शिवीगाळ करत चैतन्यला कमरेच्या बेल्टने, लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
पाठलाग करून मित्रांनाही चोप; कुटुंबाला संपवण्याची धमकी
या घटनेनंतर चैतन्य आपल्या मित्रांच्या दुचाकीवरून गावाकडे निघाला असता, आरोपींनी पाठलाग करून तळ्याची आई मंदिरासमोरील रस्त्यावर त्यांना पुन्हा गाठले. यावेळी "आमच्या नादाला लागू नकोस, पुन्हा जरांगे पाटलांचे स्टेटस ठेवलेस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना कापून टाकू," अशी धमकी देत आरोपींनी चैतन्यसह वाद मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्याच्या मित्रांनाही बेदम मारहाण केली.
केज पोलिसांत गुन्हा दाखल
या गंभीर मारहाणीनंतर जखमी चैतन्य देशमुख याने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रताप मोराळे, ऋतुराज ढाकणे, प्रकाश तांदळे आणि दिग्विजय मोराळे या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!