पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यासह महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) विकासकामांना गती देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. मुंबई येथील मंत्रालयात शैक्षणिक, प्रशासकीय व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत विद्यार्थ्यांचे वसतिगृह, रखडलेली पदभरती आणि पायाभूत सुविधांबाबत मोठे निर्णय घेण्यात आले.
विद्यावेतनात घसघशीत वाढीचा प्रस्ताव
पशुवैद्यक विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.व्ही.एससी. अँड ए.एच.) विद्यार्थ्यांना इतर वैद्यकीय शाखांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच दरमहा अठरा हजार रुपये विद्यावेतन देण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी आवश्यक असलेल्या चार कोटी बारा लाख रुपयांच्या प्रस्तावाला आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळवण्यासाठी वेगाने प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पायाभूत सुविधा आणि पदभरतीवर भर
विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी रिक्त पदांचा अडसर तातडीने दूर केला जाणार आहे. भारतीय पशु चिकित्सा परिषदेच्या (व्हीसीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि जलद गतीने राबवण्याचे आदेश त्यांनी दिले. यासोबतच मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ, उदगीर, वरुड आणि मोर्शी येथील शैक्षणिक इमारती, पशुवैद्यकीय रुग्णालये व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या बांधकामांची सद्यस्थिती तपासून ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
शुल्क संरचना आणि प्रशासकीय समन्वय
विद्यार्थ्यांचा इंटर्नशिप भत्ता तसेच पशुवैद्यकीय आणि दुग्ध तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शुल्क संरचनेबाबतही या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व प्रलंबित प्रकरणे आणि पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला 'माफसू'चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, कुलसचिव मोना ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!