गेवराई: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव खुर्दच्या मातीत जन्मलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि ख्यातनाम लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या लोककलेतील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एका दैदिप्यमान पर्वाचा अस्त झाला आहे. तमाशाच्या फडापासून आपल्या कलाप्रवासाची सुरुवात करणाऱ्या मधूताईंनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देत रुपेरी पडद्यावर आपल्या सशक्त अभिनयाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात आणि जन्मभूमीत तीव्र शोककळा पसरली आहे.
लोककलेपासून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
कोल्हाटी समाजाच्या समृद्ध लोककलेचा वारसा लाभलेल्या मधू कांबीकर यांनी सामाजिक उपेक्षा आणि संघर्षावर मात करत कलेच्या जोरावर ओळख प्रस्थापित केली. केवळ नृत्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने विविध भूमिकांना जिवंत केले. 'शापित', 'एक होता विदूषक', 'झपाटलेला', 'मुक्ता' आणि 'माझा छकुला' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. 'शापित' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर २०१८ मध्ये त्यांना मानाच्या झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. 'वस्त्रहरण' व 'विच्छा माझी पुरी करा' यांसारख्या नाटकांतूनही त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
रंगभूमीवरील अखेरची जिद्द
२७ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईतील यशवंत नाट्यमंदिरात 'लावण्य संगीत' कार्यक्रमादरम्यान सादरीकरण करताना त्यांची प्रकृती बिघडली होती. मात्र, अथांग जिद्दीच्या जोरावर त्यांनी ते सादरीकरण पूर्ण केले. त्यानंतर आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांना दीर्घकाळ उपचारांचा सामना करावा लागला आणि त्या रंगमंचापासून दूर राहिल्या. माळेगावच्या मातीचा गौरव वाढवणाऱ्या या थोर कलावंताने अखेर जगाचा निरोप घेतला असला, तरी त्यांच्या घुंगरांचा नाद आणि त्यांनी जपलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा रसिकांच्या स्मरणात चिरंतन राहील.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!