बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून एकाच भावकीतील सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या मारहाण प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब विठ्ठल शिंदे यांनी या प्रकरणी अंभोरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून आणि 'आमच्यावर खोट्या केसेस का करतोस' असा जाब विचारत आरोपींनी वाद उकरून काढला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर सुधाकर शिंदे, भानुदास शिंदे, भरत शिंदे, ऋषीकेश शिंदे, विमल शिंदे, सुमन शिंदे आणि वैशाली शिंदे या सर्व आरोपींनी संगनमत करून बाबासाहेब आणि त्यांच्या नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी, काठीने व दगडाने बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली. या हिंसक घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण असून पोलीस शिपाई पैठणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.