केज:- केज- कळंब मार्गावर एस टी महामंडळाची पर्यावरण पूरक अशी, प्रवाशांच्या सेवेसाठी वातानुकूलित ई -बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मात्र या बमध्ये शिक्षण घेण्यासाठी शाळा, महाविद्यालयात गावातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सवलतीचा पास सेवा सुरू नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी साध्या बस सेवा सुरू करा किंवा ई -बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा देण्याची मागणी साळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
केज-कळंब मार्गावर असलेल्या साळेगाव, माळेगाव, मांगवडगांव या टप्प्यावर साळेगाव, माळेगांव यासह शेलगाव गांजी, बोबडेवाडी, सुकळी, सातेफळ, मांगवडगाव, हदगाव, डोका, सारूकवाडी, चिंचोली माळी या परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी केज आणि कळंब येथील शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षणासाठी ये-जा करीत आहेत.
दरम्यान काही दिवसा पूर्वी या मार्गावर कळंब आगाराच्या पर्यावरण पूरक ई -बससेवा सुरू झाल्या असल्याने सध्या बस बंद केल्या आहेत. या बसमध्ये विद्यार्थ्यांच्या सवलतीचा पास सेवा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षण देखील थांबवावे लागणार असल्याने पालक आणि विद्यार्थी यांची मागणी लक्षात घेऊन साळेगावचे सरपंच कैलास जाधव पाटील यांनी दि. १५ ऑक्टोबर रोजी कळंब आगाराचे आगार प्रमुख घोलप यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी महामंडळा मार्फत सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास करताना विद्यार्थ्यांना विद्यार्थी पासची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता यावा. तसेच त्यांच्या शिक्षणावरील प्रवासाचा आर्थिक भार कमी व्हावा. यासाठी एस.टी. महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस मध्येही प्रचलित नियमा नुसार विद्यार्थी पास स्वीकारण्याची व पासधारक विद्यार्थ्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
आगार प्रमुख घोलप यांच्या सोबत सकारात्मक चर्चा
सरपंच कैलास जाधव पाटील, पत्रकार गौतम बचुटे आणि सुधाकर इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या गैरसोयी बाबत आगार प्रमुख घोलप यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेत या बाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्याचे आणि साध्या बस सेवा वाढविणार असल्याचे आश्वासन दिले आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!