बीड: यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून तब्बल सहा जिल्ह्यांचा मोठा प्रवास करत बीड जिल्ह्यात दाखल झालेला पट्टेदार वाघ आता नायगाव मयूर अभयारण्यात पोहोचला आहे. चार दिवसांपूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास एका पाणवठ्यावर पाणी पिताना हा वाघ वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.

२०२२ मध्ये टिपेश्वरमधील 'टी-२२' वाघिणीच्या पोटी जन्मलेल्या या वाघाने अन्नाच्या आणि स्वतःच्या हक्काच्या जंगलाच्या शोधात नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर मार्गे बीड गाठले आहे. यापूर्वी २० ऑगस्ट २०२६ रोजी आष्टी तालुक्यात दिसल्यानंतर तो गायब झाला होता. पुढे १७ ऑक्टोबरला पाटोदा तालुक्यातील सगळेवाडी आणि जरेवाडी परिसरात त्याने दोन शिकारी केल्याचे समोर आले होते.

वाघाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी पाटोदा वनपरिक्षेत्रात तब्बल २० ट्रॅप कॅमेरे आणि ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वनविभागाचे विशेष पथक तैनात करण्यात आले असून दररोज पेट्रोलिंग सुरू असल्याची माहिती पाटोदा वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल घोडके यांनी दिली आहे.